मुंबई: मुंबईत सोमवारी दिवसभर दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात आली. मुंबई आणि ठाणे भागातील दहीहंड्या फोडण्यासाठी अनेक मंडळांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, धारावीतील एका घटनेमुळे दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. याठिकाणी दहीहंडी फोडताना अंकुश खंदारे हा २७ वर्षांचा गोविंदा जखमी झाला होता. फिट आल्यामुळे तो थरावरुन खाली पडला. यानंतर त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कुशचा मृत्यू झाला. याशिवाय, आज दिवसभरात मुंबई आणि ठाण्यात ६० गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी ४० जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत.
राज्यभरात उत्साह
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव राज्यभरात पाहायला मिळतोय. इस्कॉनच्या मंदिरांत तर कृष्ण जन्मोत्सवाची विशेष शोभा पाहायला मिळाली. मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी निमित्तानं श्रीकृष्णाला सजवण्यात आलं होतं. सोबतच भजन किर्तनही रंगलं होतं. कृष्ण जन्म सोहळ्यात दूधाचा अभिषेक आणि भजन कीर्तन करण्यात आलं.
बाल कन्हैयाचं गुणगान
शिर्डी साईबाबा मंदीरातही कृष्ण जन्मोत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल कन्हैयाचं गुणगान करण्यात आलं. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं साईमंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री १२ वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.