PM Modi On Rahul Gandhi Comment About Shakti: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमधील शिवमोगा येथील प्रचारसभेमध्ये मुंबईत रविवारी झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या सभेचा उल्लेख केला. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी या जाहीर सभेमध्ये केलेल्या 'शक्ती' संदर्भातील विधानावरुन कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'इंडिया आघाडी' 'शक्ती' नष्ट करण्याचा विचार आहे, असं म्हणत निशाणा साधला. "काल (रविवारी) मुंबईतील शिवाजी मैदानामध्ये 'इंडिया' आघाडीने घोषणा केली की ते 'शक्ती'ला नष्ट करु इच्छिताता. जर ते 'शक्ती'ला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या 'शक्ती'ची पूजा करणं आमचा संकल्प आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. नारी शक्तीशी राहुल गांधींच्या विधानाचा संदर्भ जोडत पंतप्रधान मोदींनी, "नारी शक्तीचं माझ्यासाठी सर्वात मोठा आशिर्वाद आणि कवच आहे. त्यांना (विरोधकांना) भारत मातेच्या वाढत्या शक्तीबद्दल द्वेष वाटतोय," असा टोलाही लगावला.
कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये, "जेव्हा मी शिवाजी पार्कवरुन शक्ती संपवण्याची घोषणा ऐकली तेव्हा मी विचार केला की याने बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील," असाही उल्लेख केला. "शक्ती संपवण्याची घोषणा शिवाजी पार्कमधून करण्यात आली. ही तीच जागा आहे जिथे प्रत्येक मुलं 'जय भवनी, जय शिवाजी,' हा मंत्र एकत लहानाचं मोठं होतं," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. "शक्तीवर वार म्हणजे महिला, मुली आणि भारत मातेवर केलेला हल्ला आहे," असंही मोदींनी भाषणात म्हटलं.
"आमचं सरकार सर्वात जास्त प्राधान्य नारी शक्तीला देतं. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कोणत्याही सरकारने नारी शक्तीला एवढं बळ दिलेलं नाही जितकं आमच्या सरकारने दिलं आहे. त्यामुळेच आता आफलं चंद्रयान-3 अशा ठिकाणी पोहोचलं आहे जिथे आतापर्यंत कोणीही पोहचलेलं नाही. म्हणून आम्ही त्या ठिकाणाला 'शिव-शक्ती' नाव दिलं," अशी आठवणही पंतप्रधानांनी करुन दिली. "अनेक राजकीय जाणकार म्हणतात की नारी शक्ती मोदींचे गुप्त मतदार आहेत. मात्र माझ्यासाठी देशातील महिला या मतदार नाहीत तर मातेचं, शक्तीचं प्रतिक आहे. नारी शक्तीचा हाच आशिर्वाद माझ्यासाठी सर्वात मोठं कवच आहे," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
रविवारी राहुल गांधींनी शिवाजी पार्कमध्ये झालेल्या 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या समारोपाच्या सभेमध्ये, 'पंतप्रधान मोदींविरोधातील आमची लढाई ही व्यक्तीगत नाही. मोदी एक मुखवटा आहे. ते शक्तीसाठी काम करतात. ती शक्ती संपवण्याचा आमचा मानस आहे,' असं म्हटलं होतं.