दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही ११ नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यामध्ये अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सचिन आहिर या नेत्यांचा समावेश आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांची या सगळ्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
२०१८ साली पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्याची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांनी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.