मुंबई : जगभरात पसरलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पोहचल्यानंतर आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरस पसरू नये याची काळजी राज्यसरकार सर्वतोपरी घेत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी एकीकडे बैठका घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे अधिवेशन काळात विधिमंडळात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा सरसावल्या आहेत.
अधिवेशनादरम्यान विधिमंडळात येण्यासाठी प्रवेश पास दिले जातात. मंत्री, आमदार आणि नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांचीही या काळात विधिमंडळात झुंबड उडते.
आमदार, नेत्यांच्या पुढे, मागे समर्थक, कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवेश पास दिले जातात. पण कोरोना व्हायरसचा फटका आता या कार्यकर्त्यांनाही बसणार आहे.
अधिवेशन काळात विधिमंडळात येणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेश पासवर नियंत्रण आणण्याचे निर्देश देण्यात आलेत. अनावश्यक प्रवेश टाळण्याचे निर्देश दिले गेल्यानं आजपासूनच विधिमंडळातील गर्दीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश पास वाटप करू नये अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.