मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी कामाला निघालेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली आहे. यामुळे धिम्या मार्गाची वाहतूक जलद मार्गावर हलविण्यात आली आहे. दादर-परळ दरम्यान रुळाला तडा गेल्याने या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. कामाचा दिवस आणि त्यात सकाळची वेळ असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळच्या वेळेत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अधिक कार्यालये मुंबईत असल्याने कल्याणच्या दिशने प्रवासी मोठ्या संख्येत दादर ते सीएसटी दरम्यान उतरत असतात. त्यामुळे या गोंधळाचा फटका अशा प्रवाशांना बसणार आहे. या सगळ्यात प्रवाशांचा खोळंबा झाल्याने प्रवाशी आपला राग ट्वीटर, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.