मुंबई: धनंजय आज भाजपमध्ये असता आणि तशीच वेळ आली असती तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडले असते, असे वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या मंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. यावेळी त्यांना मुंडे घराण्यातील वादाविषयी विचारण्यात आले. या प्रश्नाना उत्तर देताना पंकजा यांनी म्हटले की, सगळ्याच राजकीय घराण्यांमध्ये कुरबुरी होतात. मात्र, मुंडे कुटुंबीयांचीच चर्चा जास्त होते. आमच्या घराण्याची ताकद मोठी होती. बाबा मंत्री होते. मीही लोकांच्या आग्रहाखातर राजकारणात आले. बाबांनी धनंजयलाही आमदार केले. एवढे सगळे देऊनही तो राष्ट्रवादीत गेला. आज धनंजय भाजपामध्ये असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडले असते. मात्र, आता आम्हा दोघांचे मार्ग वेगळे आहेत, असे पंकजा यांनी म्हटले.
तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी करण्याची कोणतीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. मात्र, मला सीबीआय आणि पोलिसांवर विश्वास आहे, असे सांगत पंकजा यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.
यावेळी पंकजा यांनी पुन्हा एकदा आपण कधीच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत नव्हते, हे स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाबाबत जे मी बोलले त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, राजकारणात मी माझ्या पद्धतीने काम करत जाते. मी कुणाशाही स्पर्धा करत नाही. मुख्यमंत्र्यांनी आणि मी अनेक वर्षे सोबत काम केले आहे. आमच्यात उत्तम संवाद आहे. कोणत्याही बातम्यांचा आमच्यावर परिणाम होत नसल्याचेही पंकजा यांनी सांगितले.