मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील कोणताही नेता आणि कुटुंबीयांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेतल्याचे समजते. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, अजित पवार हे मुंबईत दाखल झाले नव्हते. दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ईडीच्या कार्यालयात स्वत:हून हजर राहण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हाही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून धुसफुस सुरु असल्याची शक्यता पुढे येत आहे.
यासाठी रोहित पवार यांची बारामतीमधील उमेदवारी कारणीभूत असल्याची एक शक्यता काहीजण बोलून दाखवत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातून उतरवण्याची तयारी सुरु होती. मात्र, हा मतदारसंघ विद्यमान मंत्री राम शिंदे यांचा आहे. राम शिंदे मंत्री असल्यामुळे भाजप निवडणुकीत आपली संपूर्ण यंत्रणा त्यांच्या विजयासाठी कामाला लावेल. परिणामी रोहित पवार यांचा त्यांच्यापुढे टिकाव लागणे अवघड आहे.
त्यामुळे रोहित पवार यांना पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा विचारही पवार कुटुंबीयांमध्ये सुरु होता. तसेच अजित पवार यांच्यावर आर्थिक गुन्हा दाखल झाल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसण्याचीही शक्यता होती. त्यामुळे बारामतीमधून सातत्याने रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रोहित पवार सातत्याने शरद पवारांसोबत वावरताना दिसत आहेत. अनेकदा ते सोशल मीडियावर शरद पवार यांच्यावरील टीकेला प्रतिवाद करतानाही दिसतात. तसेच शरद पवारही जातीने रोहित यांचे ब्रॅण्डिंग करत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोहित पवार बारामतीमधून रिंगणात उतरणार, याची शक्यता दिवसेंदिवस वाढताना दिसत होती. हीच गोष्ट अजित पवार यांना खटकल्याची चर्चा आहे. या नाराजीतूनच त्यांनी आगामी काळात राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा, असे सांगितले जात आहे.