Rikshaw Driver Reaction on saif ali khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने हल्ला केला. यानंतर या आरोपीचा फोटोदेखील समोर आला असून पोलीसांची 20 पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान चाकू हल्ल्यानंतर रक्ताने माखलेल्या सैफला ऑटो रिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले. सैफला लिलावती रुग्णालयापर्यंत नेणारा ऑटो ड्रायव्हर आता समोर आला आहे. भजन सिंह राणा असे त्या ऑटो चालकाचे नाव आहे. त्या रात्री काय घडले आणि तो सैफला रुग्णालयात कसा घेऊन गेला?त्या रात्री घडलेली संपूर्ण कहाणी त्याने शेअर केली आहे.
'सैफ जखमी अवस्थेत होता. त्यांच्यासोबत एक तरुण होता. जो सैफ अली खानसोबत बसला होता. मग सैफने मला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. बाग ओलांडल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने विचारले, 'आपण होली फॅमिलीला जावे की लीलावतीला?' यावर सैफ म्हणाला की मला लीलावतीला घेऊन जा. यानंतर मी त्याला लीलावती हॉस्पिटलकडे घेऊन गेलो', अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक भजन सिंह राणा यांनी दिली.
तो सैफ अली खान आहे हे मला माहित नव्हते. तो जखमी अवस्थेत असल्याने मलाही चिंता वाटली. बंगल्यातून उतरल्यानंतर त्याने गार्डला फोन केला. 'मी सैफ अली खान आहे. कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर बोलावा', असे फोनवरचे बोलणे ऐकल्यानंतर मला तो सैफ असल्याचे कळाल्याचे रिक्षा चालकाने सांगितले.
सैफने कुर्ता-पायजमा घातला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होते. तो खाली उतरला तेव्हा मागूनही रक्त येत होते. मीही तितकं लक्ष दिलं नाही. पण ते पाहून असे दिसून आले की गंभीर दुखापत झाली आहे. त्यावेळी रात्रीचे सुमारे 2-3 वाजले असतील, असे रिक्षा चालकाने सांगितले.
ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणा म्हणाले, 'मी लिंक रोडवरून रस्त्यांवरून जात होतो आणि सैफ अली खानच्या घराजवळ पोहोचताच एक महिला धावत आली आणि रिक्षा रिक्षा म्हणू लागली. मी ज्या गेटवर गेलो त्याच्या थोडे पुढे थांबलो. पुढे जाऊन माझी रिक्षा पार्क केली. मग ती बाई गेटवर रिक्षा पार्क करायला सांगू लागली. यानंतर मी यू-टर्न घेतला आणि रिक्षा गेटजवळ पार्क केली. तेवढ्यात काही लोक आले. त्यापैकी एक रक्ताने माखलेला होता आणि पांढरे कपडे घातले होते. मी त्यांना ऑटोमध्ये बसवले. त्यांच्यासोबत एक मूलही होते, असे त्याने सांगितले.
त्यांच्यासोबत एक 7-8 वर्षांचा लहान मुलगा आणि एक तरुण होता. त्याच्या नात्यातला कोणीतरी असेल असे मला वाटले. मी त्यांना ओळखले नाही, असे रिक्षा चालकाने सांगितले.
अज्ञात आरोपीने सैफवर हेक्सा ब्लेडसारख्या शस्त्राने हल्ला केल्याचे सैफच्या मोलकरणीने तिच्या जबाबात म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लीलावती रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार, सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो स्वतः चालण्यास सक्षम आहे. त्याला जास्त हालचाल करण्याची परवानगी नाही. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागेल. सध्या त्याला विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.