CIDCO Chairman Sanjay Shirsat : महायुती सरकारमध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी आता समोर येऊ लागल्यात. शिवसेना प्रवक्ते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या सिडको अध्यक्षपदावरुनही वादंग निर्माण झालाय. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरही संजय शिरसाटांनी सिडकोचं अध्यक्षपद सोडलेलं नव्हतं. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात आलंय.
वास्तविक पाहता मंत्रिमंडळात असताना कोणत्याही लाभाच्या पदावर राहाता येत नाही. शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष म्हणून बैठकाही घेणं सुरु ठेवलं होतं. शिवाय काही निर्णयही घेतले होते. शेवटी नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानं संजय शिरसाट यांना नगरविकास पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेतला. शिरसाटांनी मात्र गुरुवारी सिडकोच्या अध्यक्षपदाचा रितसर राजीनामा दिल्याचं सांगितलंय. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र मंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आला आहे.
संजय शिरसाटांना हटवल्याचा दादा भुसेंनीही इन्कार केलाय. मंत्रिमंडळात आल्यानं शिरसाटांचं मंत्रिपद आपोआप रद्द झाल्याचा दावा दादा भुसेंनी केलाय. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यापैकी अनेक नेत्यांचा सिडकोच्या अध्यक्षपदावर डोळा आहे. शिरसाटांना हटवल्यानंतर आता सिडकोच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागलीये.
दरम्यान, सिडको महामंडळावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचाच अध्यक्ष होण्याबद्दल शिवसेनेचे नेते आग्रही असल्याची चर्चा देखील रंगली आहे. नगर विकास खातो एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे सिडको महामंडळ ही शिवसेनेकडेच असावे आणि अध्यक्ष नेमण्यासाठी शिंदे यांनाच विचारण्यात यावे अशी शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे.