मुंबई : काँग्रेसने (Congress) नाराज माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर आता पुन्हा एकदा नवी जबाबदारी दिली आहे. दरम्यान, संयज निरुपम यांनी सातत्याने पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्याआधी त्यांच्याकडून मुंबई शहरचे अध्यक्षपद काढून घेतले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाच्याविरोधात जाहीर भूमिका घेतली होती. असे असतानाही काँग्रेसने पु्न्हा त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट नाराज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही नियुक्ती पक्षाच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. (Sanjay Nirupam On State Congress Parliamentary Board)
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी देताना त्यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या स्वाक्षरीने या संदर्भातील पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत आणि संसदीय मंडळावर आणखी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि माजी आमदार जनार्दन चांदुरकर यांचीही संसदीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे तिघेही मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच याशिवाय, कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून आणखी चार जणांना स्थान देण्यात आले आहे. त्यात नाना गावडे, सचिन नाईक, संजय राठोड आणि चारुलता टोकस यांचा समावेश आहे. या निवडीमुळे काँग्रेसने आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या आधी मुंबई शहरचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची निवड केली आहे.
दरम्यान, संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. निरुपम यांच्याविरोधात पक्षातून अनेक तक्रारी होत्या. त्यानंतर निरुपम यांना अध्यक्षपदावरून बाजुला करण्यात आले. राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेसने सरकार स्थापन करण्यास निरुपम यांचा तीव्र विरोध होता. त्याबद्दलची नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही त्यांची या सरकारवर विशेषत: शिवसेनेवर टीका करणे थांबवले नव्हते. आता पक्षाच्या संसदीय मंडळात आल्यावर त्यांची भूमिका नेमकी काय असेल, याची मोठी उत्सुकता आहे. तसेच निरुपम हे काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष आहे.