मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
संजय निरुपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमधून मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळताचशालिनी ठाकरे यांनी झोन ९ चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी भेट घेतली. यावेळी निरुपम विनापरवानगी मोर्चा काढत आहेत. त्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे शालिनी ठाकरे यांनी दहिया यांच्या निदर्शनाला आणून दिले. जर निरुपम घराबाहेर पडले तर मनसे त्यांच्या स्टाईलने उत्तर देईल, अशा इशाराही दिला होता.
निरुपम यांनी दादर येथे फेरीवाल्यांचा मोर्चा आयोजित केला होता. मात्र सकाळपासून निरुपम यांच्या वर्सोवा लोखंडवाला सर्कल जवळील शास्त्रीनगर येथील ब्रेव्हरली हिल्स अपार्टमेंट येथील संजय निरुपम यांच्या घरासमोरच जमलेल्या आणि दबा धरून असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेर पडूच दिले नाही, असा दावा शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई, गोरेगाव विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव, मनीष धुरी,अखिल चित्रें, अरुण सुर्वे, रोहन सावंत यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते निरुपम यांच्या घराबाहेर रस्त्यावर जमा झाले. तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते देखील जमा झाले. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
वर्सोवा पोलिसांनी मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना तर काँगेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यासह कॉंग्रेसच्या १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले.