मुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. मात्र, विरोधकांनी यावर आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर उद्या निकाल येणार आहे. दरम्यान, मुंबईतही आज वेगवान घडामोडी घडत आहेत. फोडाफोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनेसन्स हॉटेलमधून हयात हॉटेलला हलवण्यात आले आहे तर शिवसेना आमदारांना ललितमधून हॉटेल लेमन ट्रीमध्ये ठेवण्यात आले. काँग्रेस आमदारांना जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.
महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेनेनं आपल्या आमदारांना द ललित हॉटेलमधून हलवण्याचा निर्णय घेतलाय. आमदारांना द ललित हॉटेलमधून मरोळमधील लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवण्यात येणारेय. आमदारांना फोडण्यासाठी कुठलाही प्रयत्न होऊ नये, पक्षाला कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना खबरदारी घेत आहे. दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी दाखवलीय. त्यासाठी शिवसेनेनं पाच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai: Shiv Sena MLAs have been brought to Hotel Lemon Tree, from Lalit Hotel where they were earlier lodged. #Maharashtra pic.twitter.com/qdlfysYotI
— ANI (@ANI) November 25, 2019
शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय. काँग्रेस आणि पवारांना मान्य असेल तर अजित पवारांचं मनवळवण्यासाठी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बंददाराआड ही चर्चा झाल्याचं समजतंय. पवारांच्या या प्रस्तावावरील भूमिकेबाबत माहिती मिळू शकलेली नाही.
राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. तसेच आज पुन्हा सुनावणी झाली. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले आमंत्रण आणि त्यांचा शपथविधी बेकायदा असून राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने रिट याचिकेद्वारे केली. यावर आज युक्तीवाद झाला. याबाबतच्या निर्णय उद्या येणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता निकालाबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.
आमच्याकडे १६२ आमदारांच्या पाठिंब्याच पत्र असल्याचा दावा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केलाय. राजभवनावर जाऊन महाविकासआघाडीच्या नेत्यांनी पाठिंब्याचं पत्र दिल्यानंतर त्यांनी हा दावा केला. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज राजभवन कार्यालयावर जाऊन १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं सादर केलं. या पत्रामद्ये राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या ५६ आमदारांच्या तर काँग्रेसच्या ४४ आमदारांच्या सह्या असून इतर आणि अपक्ष मिळून ११ आमदारांच्या आहेत. अशा एकूण १६२ आमदारांच्या सह्या असलेलं पत्र महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी सादर केलं आहे.