मुंबई: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांच्या मार्गात शिवसेना आडवी येण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. १ सप्टेंबरला अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही ठरला होता.
मात्र, अचानकपणे हा कार्यक्रम लांबवणीवर पडल्याने राजकीय चर्चांना उधारण आले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री आणि राज्य भाजपमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नवा खुलासा केला आहे. शिवसेनेने ग्रीन सिग्नल न दिल्यामुळेच राणेंचा भाजप प्रवेश रखडल्याची कबुली त्यांनी दिली.
शिवसेनेची हरकत नसेल तरच नारायण राणेंना भाजपात प्रवेश दिला जाईल. त्यामुळे आता नारायण राणेंचा भाजपा प्रवेश शिवसेनेच्या मर्जीवर अवलंबून आहे. तेव्हा शिवसेना आता काय भूमिका घेणार, याकडे राणेंसह सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी नारायण राणे यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या आगामी राजकीय वाटचालीविषयी भाष्य केले. एक तारखेला माझा प्रवेश होणार नसून मुख्यमंत्री आणि मी यावर चर्चा करुन निर्णय घेऊ. मी दिल्लीत राज्यसभा खासदार आहे. निलेश आणि नितेश विधानसभा निवडणूक लढवतील. भाजपाने २०१७ साली मी सहयोगी सदस्य असताना मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आताचा प्रवेश कोणत्याही कमिटमेंटशिवाय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राणेंच्या भाजपा प्रवेशाने कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. राणेंना पक्षात घेऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे. राणेंचा पक्ष प्रवेश हा शिवसेना विरोधामुळे लांबला होता. परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेऊन भाजपने मोठा डाव खेळल्याची चर्चा आहे.