मुंबई : शिवसेनेच्या निवडून आलेल्या उमेदवारांची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तासमीकरणांवर चर्चा होणार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं, याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आमदारांची मतं जाणून घेणार आहेत.
भाजपसोबत जायचं असेल तर कोणत्या अटी ठेवायच्या? ५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर ठाम राहायचं की १९९५ चा फॉर्म्युला राबवायचा. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेवून सरकार स्थापन केल्यास काय होईल? याबाबतही आमदारांचा कल घेतला जाईल. विधिमंडळ गटनेता निवडीबाबतही या बैठकीत चर्चा होवू शकते.
दुसरीकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेनं विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना बंडखोर आमदार आशिष जयस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. निवडणुकीत अपक्ष लढलो असलो तरी आम्ही शिवसेनेसोबतच असल्याचं या अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं. तर दुसरीकडे १५ पेक्षा जास्त निवडून आलेले अपक्ष आणि बंडखोर भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आता दोघांमध्ये बंडखोरांना आपल्याकडे वळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसलं तरी भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. भाजपला १०५, शिवसेनेला ५६, राष्ट्रवादीला ५४ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या आहेत. तर १३ ठिकाणी अपक्ष उमेदवार जिंकले आहेत. एमआयएमला २, बहुजन विकास आघाडीला ३, सीपीएमला १, जनसुराज्य शक्तीला १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १, मनसे १, शेकापला १, प्रहारला २, रासप १, समाजवादी पक्ष २ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली आहे.