Sanjay Raut Political Attacked: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रामध्ये यमाचा रेडा फिरतोय. त्यावर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री स्वार झाले आहेत. महाराष्ट्रात 100 हून अधिक मृत्यू झालेयत पण मुख्यमंत्र्यांना त्याचे दु:ख नाही, असे राऊत यावेळी म्हणाले. आज राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाची सुनावणी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याला उपस्थित राहतील. 3 सदस्यांसमोर ही सुनावणी होईल. पक्ष स्थापन केलेल्या पवारांसमोर कोणीतरी उभा राहून प्रश्न उभे करतो. म्हणून निवडणूक आयोगाची ही खरी कसोटी आहे.
नक्षलवादासाठी बैठकी होत आहेत. पण महाराष्ट्रात याव्यतिरिक्त 100 मृत्यू झाले आहेत. हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ऐकू जात नसेल तर ते खूप दुर्देवी असल्याचे राऊत म्हणाले.
आमदार-खासदारांची फूट म्हणजे पक्षाची फूट नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. निवडणूक आयोगासारख्या यंत्रणा देशात राजकीय दबावाखाली काम करतात, असेही ते म्हणाले.
खिचडी घोटाळा वैगरे असा कोणता घोटाळा झाला नाही. 3 रुग्णालयात 100 रुग्ण का दगावले याची चौकशी करा. आम्ही हजारो लोकांना मोफत खिचडी, पुलाव वाटत होतो. कोरोना काळात घराघरात चुली बंद होत्या. लहान मुले, ज्येष्ठांना रोज अन्न पुरवठा करत होतो. तेव्हा हे घरात लपून बसले होते. ज्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत, अशा पोलिसांच्या हाती तपास असेल तर काय अपेक्षा करणार? मी व्हिक्टीम आहे. माझा फोन टॅप झालाय. मी कोर्टात जाणार असल्याचेही राऊत म्हणाले. फोन टॅप करणाऱ्यांना महासंचालकपद दिले जाते असा आरोपही त्यांनी केलाय.