कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : या अपघातातला जबाबदार कोण, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे..... या अपघातात सिद्धेश पवारचा मृत्यू झालाय..... त्याचबरोबर असा हलगर्जीपणा भविष्यात होता कामा नये, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या जीवघेण्या हलगर्जीपणाला जबाबदार कोण... कार्यक्रमाचे आयोजक, प्रशासन, बोटचालक की सगळ्यांचाच अतिउत्साह...?
'शिवसंग्राम'चे अध्यक्ष विनायक मेटेंनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मग त्यांनी या कार्यक्रमाआधी काही काळजी घेतली होती का? बोटीत जास्त माणसं भरली असाही आरोप होतोय.
मान्यवर, निमंत्रित आणि उपलब्ध बोटी, त्यावरची लाईफ जॅकेटस आणि जीवरक्षक यांचं कुठलंही नियोजन करण्यात आलं नव्हतं का...? विशेष म्हणजे ज्यावेळी अपघात घडला, त्यावेळी ओहोटी होती.... तरीही बोट चालकाला समुद्रातला खडक कसा दिसला नाही? बोट चालक अत्यंत बेदरकारपणे बोट चालवत होता, असा बोटीमधल्या प्रवाशांचा आरोप आहे.
या अपघातात एक बळी गेलाय... पायाभरणीवेळी ठराविक लोक जाताना ही गत तर शिवस्मारकाचं बांधकाम सुरू झाल्यावर या ठिकाणी सतत वर्दळ राहील... त्यावेळी आणखी खबरदारी घ्यायला हवी... या अपघातातून प्रशासनानं वेळीच धडा घ्यायला हवा.