मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीनं (ED) कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे. नोटबंदीमुळे अडचणीत आलेल्या हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishor Chatuvedy) याने पाटणकरांच्या कंपनीत बेनामी गुंतवणूक केली. हा हवाला ऑपरेटर आणि ठाकरे कुटुंबीयांचा आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
त्यानंतर ईडी आणि आयकर विभाग हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीचा शोध घेत आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी गेल्या महिन्याभरापासून फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता नंदकिशोर चतुर्वेदीचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हा मुळचा उत्तरप्रदेशमधल्या मथूरा इथला आहे. तो व्यावसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आहे.
पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनीही जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं विकलं. त्यांच्या पिहू गोल्ड आणि सतनाम गोल्ड कंपन्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले. त्यामुळं ईडीनं पुष्पक बुलियनवर 6 मार्च 2017 रोजी केस दाखल केली. याप्रकरणी 2018 मध्ये चंद्रकांत पटेल यांना अटक झाली. पटेल यांनी पुष्पक रियालिटी कंपनीतील 20 कोटी नंदकिशोर चतुर्वेदीमार्फत बोगस कंपन्यांमध्ये गुंतवल्याचा आरोप आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हमसफर डीलर प्रा. लि. कंपनीनं श्रीधर पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला विनातारण 30 कोटींचं कर्ज दिलं. या बेनामी गुंतवणुकीमुळंच ईडीनं पाटणकर यांच्यावर कारवाई केली
नंदकिशोर चतुर्वेदी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडी आणि आयकर खात्यानं त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आलीय. दरम्यान, हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबीयांवर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केलेत.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी (Nandakishor Chaturvedi) आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय असा सवाल किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) विचारला आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांची झोप उडाली असेल असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.