CIDCO Homes : सामान्यांना त्यांच्या खिशाला परवडतील अशा दरांमध्ये घरं उपलब्ध करून देण्यात अग्रस्थानी असणारं एक नाव म्हणजे सिडको. नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये सिडकोनं आतापर्यंत बहुविध योजनांअंतर्गत किमान दरात चांगल्या सुविधा असणारी घरं सामान्यांसाठी तयार केली. आतापर्यंतच्या सिडकोच्या कैक योजनांना अर्जदारांनी चांगला प्रतिसादही दिला. पण, यावेळी मात्र याच सिडकोची सध्याची योजना मात्र गटांगळ्या खाताना दिसत आहे.
सिडकोनं काही महिन्यांपूर्वी 'माझे पसंतीचे घर' ही योजना सुरू केली होती. साधारण 26502 घरांसाठीची ही योजना सामान्यांच्या भेटीला आली. पण, त्यासाठी आतापर्यंत अवघे 22000 अर्जच दाखल करण्यात आले असून त्याच अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरलं आहे. जवळपास पाच वेळा मुदतवाढ देऊनही सिडकोच्या या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसून, मोठ्या संख्येनं घरांना वालीच नसल्याचं आता स्पष्ट होत असल्यामुळं ही योजना अपयशी ठरत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
सिडकोनं नुकतंच अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या मसुदा यादीनुसार योजनेसाठी सहभागी झालेल्या अर्जदारांची आकडेवारी समोर आली आहे. वाशी, तळोजा, पनवेल, खारघर, उलवे, खांदेश्वर या भागांमध्ये ही घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देत या घरांच्या किमती 25 लाख ते 97 लाखांदरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे.
(आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 )
खारकोपर 2A - 38.6 लाख
खारकोपर 2B - 38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो, सेक्टर 14 - 48. 3 लाख
(अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG)
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख /46.4 लाख
रेल्वे स्थानक, रुग्णालयं, भाजी मंडई, महामार्ग नजीक असतानाही या योजनेतील बरीच घरं अद्यापही अर्जदारांच्याच प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक अर्जदार आणि सोडतीसाठीच्या इच्छुकांच्या मते घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं या सोडतीचा विचार अनेकांनीच सोडला आहे. तेव्हा आता सामान्यांच्या गरजा लक्षात घेता सिडको घरांच्या दरांसंदर्भात काही महत्त्वाचा निर्णय घेतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.