मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याची दुर्मीळ घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली होती. 1 फेब्रुवारीला या महिलेची बुलढाण्यातच सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यानंतर पोटात गर्भ असलेल्या त्या बाळाला पुढील उपचारांसाठी रविवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या बाळाचे सोनोग्राफी आणि सीटीस्कॅन करण्यात आले असून, बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांच्या मार्गदर्शनामध्ये आज सकाळी या बाळावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी आलेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान करण्यात आले होते. या दुर्मीळ घटनेचे सर्वत्र आश्चर्य करण्यात येत आहे. पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’ म्हणतात.
राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर देशभरात अशा प्रकारच्या 15 घटना घडल्या आहेत. संबंधित महिलेची सिझेरियन प्रसूतीनंतर तिच्या बाळाला पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे दाखल केले आहे.
हे प्रकरण एका 32 वर्षीय महिलेचे आहे, जी आधीच दोन मुलांची आई आहे. जेव्हा ती सोनोग्राफीसाठी रुग्णालयात आली तेव्हा डॉक्टरांनी जे पाहिले ते पाहून त्यांना धक्काच बसला. त्या महिलेच्या पोटात एक मूल होते, तर त्या बाळाच्या पोटातही दुसरे मूल होते. वैद्यकीय भाषेत याला 'फेटस इन फेटू' असे म्हणतात. ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे, जी 5 लाख गर्भवती महिलांपैकी एका महिलेला घडते.
'फेटूमध्ये फेटू' म्हणजे एका बाळाच्या गर्भाशयात दुसरे बाळ वाढत आहे. ही एक अतिशय विचित्र आणि चमत्कारिक परिस्थिती आहे, कारण सहसा असे कधीच घडत नाही. यामध्ये, बाळाच्या शरीरात आणखी एक लहान मूल विकसित होते, ज्यामुळे जन्माच्या वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. या बाळाच्या जन्मानंतर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात असे डॉक्टरांनी सांगितले.