मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने एक मास्टरप्लान आखला आहे. काय आहे जाणून घ्या.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 4, 2025, 08:17 AM IST
मुंबई लोकलचे 'रूप' पालटणार; गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लान  title=
Mumbai Local Trains To Get Enhancement System To Ease Suffocation Amid Overcrowding

Mumbai Local Train Update: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी दिली. येत्या काळात 10 टक्के रेल्वे सेवांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुकर होणार आहे. 

 'वंदे भारत' एक्स्प्रेसच्या धर्तीवर मुंबईकरांसाठी आरामदायी प्रवास आणि अधिक चांगले वायुविजन अशा वैशिष्ट्यांसह नव्या रचनेतील मुंबई उपनगरी रेल्वेची ( मुंबई लोकल) बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर लोकलच्या 10 टक्के फेऱ्या वाढवण्यात येणारर आहे. नव्या लोकल बांधणीसाठी 'आरडीएसओ'ला सूचना देण्यात आल्या असून, याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या ३ हजार २०० सेवांची संख्या ३,५०० पेक्षा अधिक होणार असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. लोकलच्या सेवांची संख्या वाढविण्यासाठी दोन ट्रेन सोडण्यातील वेळ कमी करण्यासाठी सिग्नलिंग यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या १८० सेकंदाचा हेडवे १५० आणि नंतर १२० सेकंदावर आणण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या  'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी' चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे. रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे.

राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापुर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले.