Pune GBS Outbreak: महाराष्ट्रात गिया बार्रेचा रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे हा तर जीबीएसचा हॉटस्पॉट ठरतो आहे. पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 163 वर पोहोचली असून 5 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल सोमवारी 5 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
गिया बार्रेच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे कारण याचा शोध आरोग्यविभागाकडून करण्यात येत आहे. आरोग्यविभागाबरोबरच पशूसंवर्धन विभागाच्यावतीने फक्त पाणी नव्हे तर विविध पक्षी, पोल्ट्रीफॉर्म आणि मातीचे सँपल घेऊन नेमकं हा आजार का वाढत आहे, याबाबत संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक यांनी दिली आहे.
पुणे महापालिका भागातील ३२ रुग्ण, तर नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील ८६ रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १८ रुग्ण, पुणे ग्रामीण भागातील १९ रुग्ण, इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण १६३ रुग्ण आढळून आले आहे. तर १११ रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहेत. तर ४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांचा डिस्चार्ज झाला आहे.जे १११ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे त्यातील ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
पुणे महापालिका,राज्य शासन, तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध पथकांच्या माध्यमातून पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले आहे. त्यामुळं लवकरच गिया बार्रेची वाढती रुग्णसंख्या रोखण्यास यश मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
गिया बॅरे सिंड्रोमच्या नकारात्मक बातम्या येत असताना पिंपरी चिंचवडमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. इथल्या सहा वर्षीय चिमुरड्याने जीबीएस वर मात केली आहे. व्हेंटिलेटर, आयसीयू अन मग जनरल वॉर्ड असे चौदा दिवसांचे उपचार घेऊन तो आता ठणठणीत बरा झालाय. डिस्चार्ज मिळाल्यावर घरी फिजिओथेरपीचे उपचार सुरु आहेत. बाहेरचं खाल्ल्यानंतर कुटुंबीयांतील सर्वांना जुलाब झाले होते मात्र नंतर सगळे बरे झाले. आठवड्यानंतर या चिमुरड्याचे हात अन पाय दुखू लागले. त्यानंतर रुग्णालयात धाव घेण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सल्ल्यांचं तंतोतंत पालन केल्यानं आज त्यांच्या मुलाने जीबीएसवर मात करुन घरी परतला आहे.