Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या 'वर्षा' बंगल्यावर अद्यापही राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वास्तव्यास गेलेले नाहीत. सत्ताधाऱ्यांवर याच मुद्द्याला अनुसरून विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊता यांनी वेगळेच आरोप केले. वर्षा बंगला पाडून नव्यानं बंगला उभा करणार असल्याची माहिती आपल्या हाती आल्याचा दावा त्यांनी केला आणि यामागोमाग त्यांच्या आणखी एका दाव्यानं खळबळ माजली.
वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा असल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. मुख्यमंत्रिपद दुस-याकडे टिकू नये म्हणून वर्षावर जादूटोणा केल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याचं उत्तर त्यांनी द्यावं असा सवालही राऊतांनी विचारला.
'देवेंद्र फडणवीस वर्षावर अद्यापही का जात नाहीत? मारुती कांबळेचं काय झालं? हा आमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन इतके महिने झाले पण मुख्यमंत्रीपदाचं अधिकृत निवासस्थान आहे, तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्यापही राहायला जात नाहीत.
मी असं ऐकलंय... मुख्यमंत्री असं म्हणतायत की राहायला गेलो तरी तिथे (वर्षा) बंगल्यावर मी झोपायला जाणार नाही. म्हणजे हा काय प्रकार आहे? त्याचं उत्तर लिंबूसम्राटांनी द्यावं', असा सूर राऊतांनी आळवला. भाजपच्या अंतस्थ गोटात अशी चर्चा आहे की, वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या देवीची शिंग पुरली आहेत असं म्हणत जे रेडे कापले त्यांची ती शिंग आहेत अशी चर्चा असल्याचं सांगत तेथील कामगारांनीच ही माहिती दिल्याचं राऊतांनी सांगितलं.
कामाख्या मंदिरात जो बळी दिला गेला तिथून काही मंतरलेली शिंगं आणण्यात आली आणि ती तिथं पुरली गेल्याचंही म्हटलं गेलं. कर्मचारी वर्गाच्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये यासाठी ही शिंग तिथं पुरल्याची चर्चा असल्याचं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलं. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं अधिकृचत निवासस्थान हा प्रतिष्ठेचा विषय असून, तिथं नेमकं काय घडलंय, मुख्यमंत्री नेमके अस्वस्थ का? असा प्रश्न आळवत महाराष्ट्राला हे समजायलाच हवं हा आग्रही सूर त्यांनी आळवला.