कोरोनामुळे मृत पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली नोकरी

कोरोनामुळं ७ बेस्ट कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे  

Updated: May 16, 2020, 04:22 PM IST
कोरोनामुळे मृत पावलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना मिळाली नोकरी title=

मुंबई : कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत बेस्ट कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाशांची सेवा करत आहेत. यामध्ये अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काहींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकून  मृत पावलेल्या बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत रुजू करून घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ४ मृत बेस्ट कर्मचा-यांच्या नातेवाईकांस नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी  दिलासा देणारी आहे. आतापर्यंत कोरोनामुळं ७ बेस्ट कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. 

यामध्ये  मुंबई आणि उपनगर ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. तर पनवेल, उरण या ठिकाणीही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३ हजार ९७० रुग्ण आढळले असून राज्यात १ हजार ५७६  रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या ८५ हजार ९४० वर पोहोचली आहे.