मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही. मात्र, काही जणांनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरविला. त्यांची दिशाभूल केली. त्यामुळेच हा संप चिघळला, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.
एस.टी कामगारांच्या एकूण २२ संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा होऊन संघटनेच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, एसटी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. एसटी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी रस्त्यावर धावली पाहिजे. दोन महिने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्याचाही विचार कर्मचाऱ्यांनी करायला हवा.
सरकार एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज काही जणांनी पसरवला. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, परंतु, माझ्या दृष्टिने हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. कामगारांची दिशाभूल केल्यामुळेच हा संप चिघळला, असे ते म्हणाले.
एसटी चालू झाली पाहिजे, असा आग्रह यावेळी बैठकीत सगळ्यांनी मांडला, असे सांगून परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सरकारची बांधिलकी कामगार आणि जनतेसोबत आहे. ही बांधिकली जपली पाहिजे. त्यासाठी कामगारांना तीन वेळा मुदत दिली होती.
मात्र, जे कामावर परत येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी भीती दाखविण्यात आली. त्यामुळे गैरसमजातून काही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. मात्र, जे कामगार हजर होतील त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विलीनीकरनाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या मुद्द्यावर योग्य चर्चा केली जाईल. आपली रोजी रोटी महत्वाची आहे. त्यासाठी कामगारांनी कामावर हजर व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.