मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचे बळी जात असताना मुंबई महापालिका प्रशासनाला केवळ व्हीआयपी लोकांचा कळवळा असल्याचे समोर आले आहे. 'व्हीआयपी रस्त्यांवर खड्डे नकोत' असे आदेशच महानगरपालिका प्रशासनाने संबंधित विभागाला दिलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना कोण वाली, असा सवाल उपस्थित होतोय.
मुंबईतील पेडर रोड, नेपीयन्स रोड, केम्स कॉर्नर, वॉर्डन रोड, वाळकेश्वर रोड या रस्त्यावर महत्त्वाच्या लोकांची ये-जा असते. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडूच नयेत. या रस्त्यांची गुणवत्ता कायम असावी, यासाठी मनपा प्रशासन काळजी घेत आहे. या रस्त्यांसाठी साडेचार कोटीच्या कामांचा प्रस्ताव स्थापत्य समितीच्या बैठकीत मंजूर करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे समजते.
२०१६ च्या स्थापत्य कामांच्या कंत्राटीच्या अटी या कामासाठी लागू राहणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. स्थापत्य समितीच्या बैठकीत या कामाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.