मुंबई : एखादं छोटं का होईना पण हक्काचं घर असावं असं कुणाला वाटत नाही... हेच स्वप्न पूर्ण करता करता मुंबईसारख्या शहरात एखाद्या व्यक्तीचं सगळं आयुष्य निघून जातं... पण मेहनत काही संपत नाही... आपल्या मेहनतीच्या कमाईतून काही जण हे स्वप्न साकार करण्यात यशस्वीही होतात... पण, आयुष्यभराची कमाई घातलेल्या घरखरेदीमध्ये आपली फसवणूक झालीय हे लक्षात आल्यानंतर त्या माणसाची काय अवस्था होऊ शकते ते सध्या मुंबईचे रहिवासी असलेल्या शिल्पी थार्ड यांच्याकडे पाहून लक्षात येईल. मुंबईत राहणाऱ्या शिल्पी थार्ड यांनी वडाळा भागातील लोढा ग्रुपच्या रेसिडेन्सी कॉम्प्लॅक्समध्ये तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून एक आलिशान फ्लॅट विकत घेतला. पण या घराच्या बांधकामाची सत्यता जेव्हा समोर आली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
शिल्पी यांनी आपल्या घराचा एक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केलाय. एक बुक्का मारताच त्या भिंतीला मोठं भगदाड पडलेलं या व्हिडिओत दिसतंय. दुसऱ्या एका फायटीत भिंतीला मोठा तडा जातोय. या भिंती सिमेंट आणि विटांच्या नाही तर कार्डबोर्डच्या बनवलेल्या या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय. उल्लेखनीय म्हणजे, या घराची निर्मिती करताना जिप्सम बोर्ड अर्थात ड्रायवॉल किंवा प्लास्टर बोर्डचा वापर करण्यात आला होता.
महत्त्वाचं म्हणजे, शिल्पी यांनी गेल्या वर्षीच या घराचा ताबा घेतलाय. इमारतीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे त्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट कसं काय मिळू शकतं? असा सवालही या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. या इमारतीत ड्रेनेज पाईप घराच्या आतमध्ये आहेत... त्यामुळे हे पाईप तुंबले तर काय होऊ शकतं, याची कल्पना तुम्ही करूच शकता.
घरात ड्रेनेजचं काम सुरू असताना एका थर्ड पार्टी आर्किटेक्टला बोलावून चौकशी केली तेव्हा घराच्या भिंती खूपच तकलादू असल्याचं लक्षात आलं, अशी माहिती शिल्पी यांनी दिलीय. या भिंतींमधून पाणी तर सहजच झिरपू शकतं. इतकंच नाही तर आग लागली तर हे घर अगदी सहजच आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतं.
शिल्पी यांनी त्यांचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णराज राव यांच्या माध्यमातून एक लाईव्ह डेमो देत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. धक्कादायक म्हणजे, व्हिडिओ काढत आहेत हे लक्षात आल्यानंतर घरमालकालाच सिक्युरिटीनं आपल्या घरात जाण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला.
लोढा ग्रुपनं मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचा सांगत शिल्पी यांचा आरोप फेटाळून लावला. शिल्पी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना यासंदर्भात एक पत्र लिहून बिल्डर विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय.