मुंबई : मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची ऐतिहासिक वास्तू मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आतून पाहता येणार आहे. नवीन वर्षात महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये शनिवार आणि रविवारी हेरीटेज वॉक करता येणार आहे. राज्य सरकार आणि महानगरपालिकेत यासंदर्भात करार झाला आहे. यानिमित्त पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेत येऊन इमारतीचा आढावा घेतला आहे. महापौर किशोरी पेडणेकर याही यावेळी उपस्थित होत्या.
महानगरपालिकेची ऐतिहासिक पुरातन वास्तू आता पर्यटकांसाठी खुली होणार आहे. बीएमसी आणि एमटीडीसी यांच्यात याबाबत करार झाला आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. महापालिकेची ही वास्तू अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. या वास्तूचं अंतर्बाह्य सौंदर्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत महापालिका आणि एमटीडीसीमध्ये याआधीच सामंजस्य करार करण्यात आला होता.
मुंबई महापालिकेची आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख आहे. महापालिकेची ही वास्तू ब्रिटिश काळात बांधली गेली होती. या वास्तूला 125 हून अधिक वर्ष झाले आहेत. 1889 ला याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 1893 मध्ये अवघ्या चार वर्षात ही ऐतिहासिक वास्तू तयार झाली.
महत्त्वाचं म्हणजे या वास्तूची संकल्पना ब्रिटिशांची असली तरी त्याचं कंत्राट एका भारतीयानेच घेतलं होतं. यासाठी अंदाजे 11 लाख 88 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. पण याचं बांधकाम 11 लाख 19 हजारांमध्ये पूर्ण झालं.