APMC Market Video: किळसवाणे! कुत्र्याने चाखलेल्या बर्फानंतर आता सडलेल्या फळांचा ज्युससाठी वापर

APMC Market Video: नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील धक्कादायक विडिओ व्हायरल होत आहे. यात एक परप्रांतीय व्यक्ती  सडकी फेकून दिलेली सफरचंद वेचताना दिसत आहे.

Updated: Apr 24, 2023, 06:55 PM IST
APMC Market Video: किळसवाणे! कुत्र्याने चाखलेल्या बर्फानंतर आता सडलेल्या फळांचा ज्युससाठी वापर  title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे शीतपेयांची मागणी देखील वाढली आहे. मात्र, हेच ज्यूस नागरीकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात. ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ कुत्रा चाखत होता. हिंंगोलातील (Hingoli) या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर आता नवी मुंबईत (Navi Mumbai) असाच काहीसा प्रकार घडला आहे. ज्यूस साठी सडलेल्या फळांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.   

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील धक्कादायक विडिओ व्हायरल होत आहे. यात एक परप्रांतीय व्यक्ती  सडकी फेकून दिलेली सफरचंद वेचताना दिसत आहे. बाजार आवारात व्यापाऱ्यांनी फेकून दिलेल्या सडक्या सफरचंदाचा वापर ज्यूस बनविण्यासाठी केला जात असल्याचे हा व्यक्ती व्हिडिओत सांगत आहे. पण, आपला व्हिडिओ घेतला जात असल्याचे समजल्यावर त्याने शब्द फिरवण्याचा प्रयत्न केला.  घरी ज्यूस बनवण्यासाठी हे सफरचंद घेवून  जात असल्याचे या व्यक्तीने व्हिडिओत सांगितले.   यामुळे तुम्ही ज्यूस पीत असाल तर सावधान. कारण,  सडक्या फळांचा ज्यूस तर पीत नाही याची खात्री करा. 

नवी मुंबईच्या फळ बाजार आवारात  फेकून  दिलेली फळे  काही  लोक  निवडुन बाहेर फुटपाथ वर विकतात. ही फळे सडकी असून ती नागरिकांनी घेऊ नये असे आवाहन  एपीएमसी बाजार समिती फळ मार्केट संचालक  संजय पानसरे यांनी केले आहे. 
खराब फळे आणि फळांचा ज्यूस घेतल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे पोटाचे विकार होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे नेरुळ येथील येरळा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या आहारातज्ञ डॉ .मीनल पाजाई यांनी सांगितले.   

हिंगोलीत कुत्रा चाखत होता ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ

हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील एका ज्यूस सेंटर समोरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. शीत पेयासाठी वापरल्या जाणारा बर्फ अत्यंत घाणेरड्या पद्धतीने हाताळला जात असल्याचे व्हिडिओत दिसून आले. ज्युस सेंटरला बर्फ पुरवणारे बर्फ उत्पादक करणारे व्यक्ती सकाळीच बर्फाची लादी ज्यूस सेंटरच्या बाहेर नेऊन टाकतात. अनेक ज्यूस सेंटर सकाळी दहा नंतर उघडतात. यामुळे ज्युस सेंटर चालक दुकान सुरु करेपर्यंत त्यांचा बर्फ ज्युस सेंटरच्या बाहेर रस्त्यावरच पडून राहतो. हिंगोलीत ज्युस सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला बर्फ  कुत्रे चाखताना दिसत आहेत. हा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.