वंचित बहुजन आघाडीत फूट; लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली आहे.

Updated: Jul 4, 2019, 04:33 PM IST
वंचित बहुजन आघाडीत फूट; लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्वप्नांवर पाणी फेरणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचे समोर आले आहे. 'वंचित'चे नेते लक्ष्मण माने यांनी एका मुलाखतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या भवितव्याविषयी शंका निर्माण झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पानिपत झाले होते. प्रकाश आंबेडकरांनी घडवलेल्या दलित-मुस्लिम एकीने आघाडीची मते मोठ्या प्रमाणात फोडली. यामुळे काँग्रेसच्या अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे या दिग्गज नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एकही जागा निवडून आली नाही, असा आरोप लक्ष्मण माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसवले. त्यामुळे ही आघाडी आता वंचितांची राहिलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा. राज्यभर आम्ही खपलोय. पदरचे पैसे घालून काम केलंय. हे आयत्या बिळावरचे नागोबा असल्याचे सांगत लक्ष्मण माने यांनी वंचितचे सरचिटणीस गोपीचंद पडाळकर यांनाही लक्ष्य केले. 

तसेच गोपीचंद पडळकर हे संघाचे कार्यकर्ते आहेत. ना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांनी त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोपही माने यांनी केला. आंबेडकरांच्या कामाची ही पद्धत चुकीची आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून फारकत घेत असल्याचे सांगत लक्ष्मण माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

दरम्यान, गोपीचंद पडाळकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत लक्ष्मण माने यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक आहेत. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी माने यांनीच आपले नाव सूचवले, तसेच अनुमोदनही त्यांनीच दिले. त्यांचे दुखणे काही वेगळेच असल्याचे गोपीचंद पडाळकर यांनी सांगितले.