मुंबई : मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आपल्या ऐशोआरामाची इच्छा पूर्ण करुन तिथून पळ काढणाऱ्या ठगास बेड्या ठोकण्यात आल्यायत. आपल्या जीवाची मुंबई करण्याची आणि फुकटात उच्च प्रतीची जीवनशैली जगण्याची सवय लागलेल्यास चांगलाच दणका देण्यात आलाय. व्हीनसेंट जॉन असे या फुकट्या आरोपीचे नाव आहे.
देशातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये जात हाय प्रोफाईल सूट बुक करून त्याठिकाणी राहत उच्चप्रतीचे मद्य आणि सिगारेटची मागणी करून तिथून पळ काढणाऱ्या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली. 65 वर्षाच्य़ा व्हीनसेंट जॉनने स्वतःच्या मौज मजेसाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करत आतापर्यंत देशातील जवळपास 187 वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली.
अस्सलखित इंग्रजी भाषेचा वापर करून आपण उद्योगपती असल्याचं भासवत त्यांनी ही फसवणूक केली. हॉटेलमधल्या महागड्या वस्तूही घेऊन ते पळ काढायचे. वाशीतल्या तुंगा हॉटेलमध्ये देखील या ठगाने असेच कृत्य करत हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक केली. वाशी पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपी ठगाचा शोध घेत त्याला अटक केली.