मुंबई: भाजपकडून मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत स्थान न मिळाल्याने विनोद तावडे चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे यादी जाहीर झाल्यानंतर तावडे यांनी तातडीने भाजप मुख्यालयात धाव घेतली. याठिकाणी तावडे तब्बल तीन तास ठाण मांडून असल्याचे कळते. यावेळी त्यांनी भाजपचे माजी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली.
यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, त्यांची एकूणच देहबोली पाहता उमेदवारी न मिळाल्यामुळे तावडे तणावात असल्याचे दिसून आले. परंतु, दुसऱ्या यादीत आपल्याला नक्की स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणून विनोद तावडे ओळखले जातात. २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार सोपवण्यात आला होता. या काळात ते काही वादांमध्येही सापडले होते. त्यामुळेच तावडे यांच्या उमेदवारीवर गंडांतर आले का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत तावडे यांच्याशिवाय एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि दिलीप कांबळे यांचीही नावे वगळण्यात आल्याचे समोर आले. पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघातून दिलीप कांबळे यांच्याऐवजी सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुलूंडमधील भाजपचे ज्येष्ठ आमदार सरदार तारासिंह यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी मिहीर कोटे यांनी संधी देण्यात आली आहे. तर दक्षिण नागपूरमधून आमदार सुधाकर कोहळे यांच्याऐवजी मोहन मते यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.