दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि शिवसेनेत मेगाभरती झाली. भाजपात तर मेगाभरतीचे चार चार टप्पे उरकले गेले. ज्यांनी पक्षांतर केलं त्यांना भाजपा आणि शिवसेनेनं उमेदवारीही दिली. पण मतदारांच्या मनात वेगळंच काही होतं. मतदारांनी या उमेदवारांना सपशेल नाकारलं.
काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरात पराभव झाला. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या वैभव पिचडांचा अकोलेत पराभव झाला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या रश्मी बागल यांचा करमाळ्यात पराभव झाला. तर काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या निर्मला गावितांना इगपुरीत पराभव स्वीकारावा लागला.
सत्ताधारी शिवसेना भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातले अनेक दिग्गज नेते फोडून विरोधकांना घायाळ केलं. पण जनता जनार्दनाच्या मनात काही वेगळंच होतं. याचा अंदाज ना आयारामांना आला ना नेत्यांना...यापुढंच्या काळात वाऱ्याची दिशा पाहून पक्षांतर करणारे नेते पक्ष बदलताना आता शंभरवेळा विचार करतील हे नक्की.