कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मागील दोन दिवसांत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळं तलावांच्या एकूण पाणीसाठ्यामध्ये ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर अर्थात ५ हजार १६८ कोटी लीटरची भर पडली आहे. या तलाव साठ्यातून मुंबईला दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो.
ही एकंदर आकडेवारी लक्षात घेतल्यास गेल्या दोन दिवसात सुमारे १३ दिवसांच्या पाणी साठ्याची भर पडली आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव असून यापैकी ५ तलाव हे बृहन्मुंबई महापालिकेचे आहेत, तर २ तलाव हे राज्यशासनाच्या अखत्यारितील आहेत. या तलावांची पाणी पातळी रोज सकाळी ६ वाजता मोजली आणि नोंदविली जाते. यानुसार दि. ४ जुलै २०२० रोजी ७ तलावातील एकूण पाणीसाठा हा १ लाख ९ हजार ७ दशलक्ष लीटर एवढा होता. तर आज दि. ६ जुलै २०२० रोजी हा पाणीसाठा १ लाख ६० हजार ६९२ दशलक्ष लीटर एवढा झाला आहे. याचाच अर्थ दोन दिवसात झालेल्या पावसामुळे तलावांच्या पाणीसाठ्यात ५१ हजार ६८५ दशलक्ष लीटर एवढी वाढ झाली आहे.
सर्वाधिक म्हणजेच ३८ हजार २०८ दशलक्ष लीटरची वाढ ही 'भातसा' मध्ये, तर या खालोखाल ३ हजार ८०७ दशलक्ष लीटरची वाढ 'विहार' तलावात झाली आहे. यानंतर तानसा तलावात २ हजार २२१ दशलक्ष लीटर, तुळशी तलावात २ हजार ३८ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणा १ हजार ९३० दशलक्ष लीटरची वाढ झाली आहे. तर अप्पर वैतरणा तलावातील जलसाठ्यात कोणतीही वाढ नोंदिवण्यात आली नाही.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावांच्या साठ्यात वाढ झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अद्यापही कमी आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी म्हणजेच दि. ६ जुलै २०१९ रोजी सातही तलावांचा एकूण पाणीसाठा हा २ लाख १६ हजार ५२२ दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या तुलनेत ५५ हजार ८३० दशलक्ष लीटरने अधिक होता. तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच दि. ६ जुलै २०१८ रोजी ३ लाख ५५ हजार ३६० दशलक्ष लीटर एवढा होता, जो यंदाच्या पाणीसाठ्यापेक्षा दुपटीनेही अधिक होता.
मागील वर्षी १२ जुलै २०१९ रोजी तुळशी तलाव हा पूर्ण भरुन वाहू (Overflow) लागला होता. त्यानंतर दि. २५ जुलै २०१९ रोजी तानसा, दि. २६ जुलै २०१९ रोजी मोडक सागर, दि. ३१ जुलै २०१९ रोजी विहार, दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजी मध्य वैतरणा आणि दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी अप्पर वैतरणा तलाव भरून वाहू लागले होते.