मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा (Mansukh Hiren Murder Case) तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास पथकानं (NIA)आज मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या प्रतिज्ञापत्रात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे मनसूख हिरेनच्या हत्येत मु्ख्य सूत्रधार असल्याचं नमूद केलं आहे.
NIA नं प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय?
कथित कट ह मुंबई पोलीस आयुक्तांच्या इमारतीत रचण्यात आला होता, जिथे प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी विविध बैठकांना उपस्थित होते, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी एपीआय सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिले, असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 17 जुलै रोजी ठेवली आहे.
काय होतं मनसुख हिरेन हत्या प्रकरण?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेच्या काही दिवसांनीच म्हणजे 5 मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता.
मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा करत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली, तसंच आणखी 8 आरोपींविरोधआत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हिरेन यांना क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करण्यात आलं होतं, त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केली. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता असं नमुद करण्यात आलं होतं.