मुंबई : नालासोपारा स्फोटकांप्रकरणी एटीएसनं घाटकोपरमधून अटक केलेल्या अविनाश पवारला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अविनाशला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडी आज संपतेय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत अविनाशचा संबंध असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे एटीएसची कोठडी संपल्यानंतर सीबीआय अविनाशचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
३० वर्षीय अविनाश अनंत पवार उर्फ अजीत दादा याला एटीएसनं शुक्रवारी रात्री मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक केली होती. पवार माझगाव डॉक लिमिटेड (एमडीएल)मध्ये पाईप-फिटरचं काम करत होता. उल्लेखनीय म्हणजे, ही कंपनी भारतीय नौसेनेसाठी जहाजं आणि पानबुड्यांची निर्मिती करते. या प्रकरणात आत्तापर्यंत एटीएसनं अविनाश पवार सोबतच वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर अटक केलीय. शरद कळसकरने डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आपला हात असल्याचं मान्य केल्यानंतर सीबीआयने त्याचा ताबा मागितला होता.
यापूर्वी, दाभोलकर हत्या प्रकरणातला आणखीन एक आरोपी शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास सत्र न्यायालयानं नकार देत सीबीआयचा अर्ज २९ ऑगस्ट रोजी न्यायालयाने फेटाळून लावला होता. शरद कळसकर हा ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडीत असल्यामुळं अशा प्रकारे ताबा देता येणार नसल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं होतं. विशेष म्हणजे शरद कळसकरचा ताबा सीबीआयला द्यायला एटीएसनं ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. याबद्दलही न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं होतं.