ठाणे: रेमंड कंपनीकडून ठाण्यातील २० एकर भूखंड विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिंगापूरची खाजगी इक्विटी कंपनी असलेल्या झँडरने हा भूखंड ७१० कोटींना विकत घेतल्याचे समजते.
रेमंडकडून गेल्या काही दिवसांपासून या मालमत्तेची विक्री करून निधी उभारण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यानुसार रेमंडची सहकारी असलेल्या जेके इन्व्हेस्टो लिमिटेडने मान्यता दिल्यानंतर रेमंडकडून हा भूखंड विकण्यात आला.
सिंघानिया हायस्कूलला लागून असलेला हा भूखंड ठाण्यातील मोक्याच्या जागांपैकी एक मानला जातो. आगामी काळात २० एकरांच्या या भूखंडावर मोठ्याप्रमाणावर व्यापारी संकुले उभारली जातील. या जागेवर संकुल उभारल्यानंतर वर्षाला २ कोटी ग्राहक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या संकुलाच्या माध्यमातून कंपनी सुमारे ४००० रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
बांधकाम क्षेत्राचा विचार करता ही ठाण्यातील मोठी परदेशी गुंतवणूक ठरेल, असे मत रेमण्डचे सीएमडी गौतम सिंघानिया यांनी व्यक्त केले.
यंदाच्या मार्च महिन्यात रेमंडकडून बांधकाम क्षेत्रात प्रवेश करण्याचे संकेत जाहीर करण्यात आले होते. ठाण्यात रेमंडच्या मालकीची तब्बल १२५ एकर जमीन आहे. यापैकी १४ एकर जागेवर 'रेमंड रियालिटी' रहिवाशी संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये ४२ मजल्यांचे १० टॉवर उभारण्यात येतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे परसिरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांना एक चांगला पर्याय नक्कीच उपलब्ध होईल, असेही सिंघानिया यांनी सांगितले. तर दुसऱ्या टप्प्यात रेमंड रियालिटीकडून लोअर परळमधील सहा एकर जागेवर निवासी संकुल उभारण्यात येणार आहे.