www.24taas.com, मुंबई
माधुरी दीक्षितच्या बहुचर्चित मेणाच्या पुतळ्याचे अनावरण ७ मार्च रोजी लंडनमधील मादाम तुसाँमध्ये होणार आहे. माधुरी दीक्षित हिने ट्विट करुन ही बातमी घोषित केली आहे. माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वीच डेनेव्हर सोडून पुन्हा मुंबईला स्थायिक झाली आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरीने आपली वेबसाईटही लाँच केली.
माधुरी दीक्षित आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी आणि लालित्यपूर्ण नृत्यासाठी सुप्रसिद्ध आहे. माधुरी दीक्षित तेजाब, राम लखन, साजन, बेट, दिल, हम आपके है कौन!, दिल तो पागल है, देवदास इ. सिनेमांतील अभिनयामुळे लोकप्रिय झाली. दमदार अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केल्यानंतर माधुरी २००२ मध्ये बॉलिवूड सोडून अमेरिकास्थित डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाहबद्ध झाली. गेले काही वर्षं आपले पती आणि २ मुलांसह ती डेनेव्हर येथेच राहात होती.
लग्नानंतर ‘आजा नचले’ या सिनेमातून माधुरी पुन्हा बॉलिवूडमध्ये आली खरी. पण, हा सिनेमा फारसा चालला नाही. मात्र, छोट्या पडद्यावर ‘झलक दिखला जा’ या डान्सिंग शोची जज बनून तिने पुन्हा रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. सध्या ४४ वर्षीय माधुरी पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.
माधुरी दीक्षितचा मेणाचा पुतळा बनवण्यासाठी अंदाजे १,५०,००० पाऊंड्स एवढा खर्च आला असून गेले चार महिने शिल्पकारांच्या एक टीमपासून ते हेअर एक्सपर्ट्स, वॉर्डरोब एक्सपर्ट्स, मेक-अप एक्सपर्ट्स यासाठी खपत आहेत. शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय, हृतिक रोशन, करिना कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या अभिनेत्यांचे पुतळे यापूर्वीच मादाम तुसाँमध्ये बनवले गेले आहेत. माधुरी दीक्षितचंही नाव या यादीत ७ मार्चपासून समाविष्ट होईल.