www.24taas.com, नवी दिल्ली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा उपोषण सोडण्याचा निर्णय आणि राजकारणात उडी घेण्याची केलेली घोषणा यामुळे आंदोलनाचे वातवरणच पलटून गेले आहे. अण्णांचा हा निर्णय नव्या पर्वाची सुरुवात की जुन्या पर्वाचा शेवट? याबाबत उत्सुकता शिगेला पोहली होती. जंतरमंतरवर लाखोंच्या उपस्थित अण्णा हजारे यांनी आता आरपारची लढाई, असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर एकच जलोष पाहायला मिळाला.
सगळ्याच पक्षात भ्रष्टाचार असल्याचा आरोप करणारे अण्णा यांनी म्हटले आहे की, देश आता जागा झाला आहे. देहात प्राण असेपर्यंत मी लढणार आहे. मात्र, मी निवडणूक लढणार नाही. आंदोलन संपूर्ण क्रांतीच्या बाजूने जात आहे. समाज्याच्या भल्यासाठी मी लढत आहे. मात्र, सरकारला त्याचे काही देणंघेण नाही. पर्याय देण्यासाठी मी देशभर फिरणार आहे, माझं जीव देशासाठी आहे. मला मरण आले तरी चालेल. मी मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई आहे, असे अण्णां यांनी जाहीर केले.
टीम अण्णा आज सायंकाळी पाच वाजता उपोषण सोडणार आहे. त्यासाठी विविध मान्यवर जंतरमंतरच्या मंचावर दाखल झाले आहेत. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत टीम अण्णा उपोषण सोडणार आहेत. दरम्यान, टीम अण्णाचे सदस्य डॉ. संजीव छिब्बर यांनी टीमचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला आहे की, आंदोलनाच्या पैशातून केजरीवाल निवडणूक लढवू इच्छित आहेत.
टीम अण्णा आज उपोषण सोडून देशाला एक राजकीय पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात असले तरी, राजकीय पक्ष काढण्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही, असे मत टीम अण्णाचे सदस्य मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरुन टीम अण्णांत मतभेद असल्याचे बोलले जात आहे. काहीजण पक्ष काढावा, या मताचे आहेत. तर, काही जण पक्ष काढणे सोपे आहे पण तो चालविणे अवघड असल्याचे सांगत आणखी थोडा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
टीम अण्णाचे सदस्य गोपाल राय यांनी निवडणुकीत उतरण्याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, २०१४च्या जर आपले लोक निवडून आले तर सध्याच्या सरकारमधील १५ भ्रष्ट मंत्री जेलमध्ये असतील. तर, कुमार विश्वास यांचा पक्ष काढण्याला विरोध आहे. त्यामुळे टीम अण्णा काय निर्णय याकडे लक्ष लागले आहे.