www.24taas.com, मुंबई
देशातल्या सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 % आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नव्या शिक्षण हक्क कायद्यात समाजातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही तरतूद करण्यात आली होती. मात्र या तरतुदीला खासगी शाळा हक्क कायद्यांतर्गत आव्हान देण्यात आले होते. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं शिक्षण हक्क कायद्यातील तरतूद योग्य ठरवत देशातल्या सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय दिलाय.
देशातले लाखो पालक गेल्या 8 महिन्यांपासून या सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते. या सकारात्मक निर्णयामुळं आता लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.