जनतेच्या हितासाठी राजकारणात - अण्णा हजारे

जनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Updated: Jul 27, 2012, 12:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

जनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला  जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

 

भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर फक्त उपोषण आणि आंदोलन करणे हा त्यावर पर्याय नाही तर त्यावर राजकीय पर्यायी व्यवस्था असणे गरजे आहे. ती व्यवस्था तयार करण्यासाठी राजकीय विचारांची आवश्यकता आहे. त्यामुळे जनता म्हणत असेल तर राजकारणात जायला काही हरकत नाही. मात्र, मी काही राजकारणात जाणार नाही. परंतु, अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव व किरण बेदीसारख्या माझ्या सहका-यांनी निवडणूक लढवली तर माझा त्यांना पाठिंबा असेल, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

 

या मुलाखतीच्यावेळी अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी लढा व परदेशात असलेल्या काळ्या पैशांबाबत चर्चा केली. अण्णा म्हणाले, देशातील भ्रष्टाचार खरोखरच नष्ट करायचा असेल तर, उपोषण व आंदोलन पुरेसे ठरणार नाही. त्यासाठी राजकीय व्यवस्थेसारखा पर्याय उपलब्ध पाहिजे. राजकीय प्रक्रियेतून सत्ता मिळते व त्या सत्तेतून तुम्ही हवे तसे बदल घडवू शकतो.

 

लोकांना सशक्त पर्याय आहे. लोक  उपोषण, आंदोलन याला कंटाळले आहेत. त्यासाठीच काहीतरी नवीन पर्यायी व्यवस्थेची गरज भासत आहे. त्यामुळे निवडणूक लढवून त्यावर लढा द्यायला हवा. मात्र मी निवडणूक लढविणार नाही. मात्र, स्वच्छ चारित्र्यांच्या लोकांसाठी मी पुढे जाईन व त्यांच्या प्रचारात भाग घेईन.  त्यासाठी मी लोकांना भेटून जनजागृती करीत आहे करणार आहे, असे अण्णांनी यावेळी स्पष्ट केले.

 

अण्णा आणि टीम अण्णांनी बुधवारपासून केंद्रातील १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीसाठी समिती नेमावी यासाठी जंतर-मंतरवर आंदोलन सुरु केले आहे.