www.24taas.com, मुंबई
आर्थिक आरिष्ट, संघर्ष, युध्द आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जगभरात उलथापालथ झाली तरी चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत जग अधिक आनंदात आहे. तसंच इंडोनेशियन, भारतीय आणि मेक्सिकन हे जगातील सर्वात आनंदी लोकं असल्याचं एका आंतरराष्ट्रीय जनमतचाचणीतुन समोर आलं आहे.
इप्सॉस ग्लोबलने २००७ सालापासून २४ देशातील १८,००० लोकांच्या जनमतचाचणी अंती हा निष्कर्ष काढला आहे. इप्सॉसचे जॉन राईट यांच्या मते आम्ही गेली काही वर्षे यासंबंधीचा जनमत आजमावून मागोवा घेत असल्याने जग आज आनंदी असल्याचा निष्कर्ष काढु शकतो.
ब्राझिल आणि टर्कीचा जगातील आघाडीच्या पाच आनंदी राष्ट्रांमध्ये समावेश आहे. हंगेरी, दक्षिण कोरिया, रशिया, स्पेन आणि इटली या देशांमध्ये सर्वात कमी आनंदीत लोक असल्याचं आढळून आलं आहे. आर्थिक प्रगती किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृध्दी पलीकडेही अनेक घटक आहे जे लोकांना आनंदित करतात त्यामुळेच आर्थिक परिस्थिती केवळ एक पैलु आहे असं राईट म्हणाले.
लॅटिन अमेरिकेत सर्वाधिक आनंदीत लोकांचे वास्तव्य आहे त्यापाठोपाठ उत्तर अमेरिका, आशिया-पॅसिफिक आणि मध्यपूर्व आणि आफ्रिकेचा क्रमांक लागतो. युरोपातील फक्त १५ टक्के लोकांनी आपण आनंदीत असल्याचं सांगितलं. विवाहीत जोडप्यांनी अविवाहितांच्या तुलनेत आपण अधिक आनंदीत असल्याचं सांगितलं. तसंच शिक्षण आणि वय यांचाही मोठा प्रभाव दिसून आला. पसतीस वर्षाखाली लोकांनी आपण अधिक आनंदीत असल्याचं सांगितलं. उच्च शिक्षण आणि आनंदाची अनुभूती यांचाही मेळ दिसून आला.