राष्ट्रपती निवडणुकीचा तिढा कायम

राष्ट्रपती निवडणुकीचा तिढा कायम आहे. राष्ट्रपती कोणाला बनवायचे याबाबत नावावर अजूनही एकमत झालेले नाही. काँग्रेसने पुढे केलेली नावे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांना मान्य नाहीत. तसे दोघांनी मीडियासमोर सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी यांना धक्का बसला आहे.

Updated: Jun 13, 2012, 07:09 PM IST

www.24taa.com,  नवी दिल्ली

राष्ट्रपती निवडणुकीचा तिढा कायम आहे.  राष्ट्रपती कोणाला बनवायचे याबाबत नावावर अजूनही एकमत झालेले नाही. काँग्रेसने पुढे केलेली नावे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांना मान्य नाहीत. तसे दोघांनी मीडियासमोर सांगितले. त्यामुळे सोनिया गांधी यांना धक्का बसला आहे.

ममता आणि मुलायम यांनी हमीद अन्सारी, प्रणव मुखर्जी यांच्या नावाला विरोध केला आहे. मात्र हा विरोध करताना ममता बॅनर्जी, मुलायम सिंह यांनी सोमनाथ चटर्जी, मनमोहन सिंग, ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची नावे राष्ट्रपती पदासाठी सुचविली आहेत. त्यामुळे काँग्रेस आता कोणाला पसंती देणार याची उत्सुकता आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनाच राष्ट्रपती पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीसाठी रवाना झाल्यात. पश्चिम बंगालसाठी कोणतंही पँकेज मागितलं नाही अशी प्रतिक्रिया ममता बॅनजी यांनी भेटी आधी दिलीय.  ममता बॅनर्जी यावेळी राष्ट्रपतीपदासाठी प्रणवदांच्या नावाला समर्थन देण्याच्या बदल्यात पश्चिम बंगालसाठी आर्थिक पॅकेज मागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही.

सोनिया गांधी यांनी स्वतः फोन करुन ममता यांना दिल्लीला बोलावलंय. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रणव मुखर्जींचं नाव पुढे असलं तरी कॉँग्रेसने अजूनही याबाबत मौन कायम राखलंय. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण याबाबत याचा निर्णय कॉँग्रेस आजच्या चर्चेनंतर घेण्याची शक्यता आहे. दरम्यान ममता यांनी पुन्हा सपा अध्यक्ष मुलायम सिंहांचीही भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसने सुचविलेली नावे मान्य नसल्याचे म्हटले. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने आता काय होणार याची उत्सुकता लागली आहे. कारण निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे.