www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी संसदेत आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प मांडायला सुरवात केली आहे. त्रिवेदींनी रेल्वे सुरक्षेला प्राधान्यक्रम देणार असल्याचं आपल्या भाषणात म्हटलं आहे. जान है तो जहाँ है हे आमचे ब्रीद वाक्य असेल असं ते म्हणाले.
येत्या पाच वर्षात रेल्वे अपघात कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सध्याच्या सुरक्षा उपायांवर आम्ही समाधानी नाही ही त्यांची स्पष्टोक्ती बरंच काही सांगून जाते. सुरक्षिततेच्या कडक उपाययोजनांसाठी रेल्वे सुरक्षा प्राधिकरण स्थापन करणार असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं आहे.
रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाच लाख ६० हजार कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम रेल्वे हाती घेणार आहे. तसंच रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. पायाभूत सुविधांसाठी अडीच लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सॅम पित्रोडा समितीने तयार केलेल्या आधुनिकतेच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.