www.24taas.com, सीना कोळेगाव
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना-कोळेगाव धरणातून सोलापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा दिलेला निर्णय राज्य सरकारनं अखेर रद्द केला आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. मात्र, राज्य सरकरारच्या निर्णयाबाबत आमदार दिलीप माने यांनी नाराजी व्यक्त करून आंदोलनाबाबत चर्च ा केल्यानंतर दिशा ठरविली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
सीना कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूरला देण्याचा निर्णय सरकारने घेताच, याचे तीव्र पडसाद उमटू लागले. याआधी दक्षिण सोलापूरचे आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिका-यांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून आंदोलन केले होते. त्यानंतर जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी सीना कोळगाव प्रकल्पातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र, नागरिकांनी थेट धरणाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून आंदोलन केले होते.
या संघर्षामध्ये सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या नागरिकामध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. दरम्यान, सोलापूरचे आमदार दिलीप माने यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सरकारनं हा निर्णय आकसापोटी घेतल्याचा आरोप आमदार मानेंनी केला होता. याबाबत केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही मानेंनी सांगितले आहे. या भेटीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असंही माने म्हणाले.