ग्रामविकासमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहाराचा प्रश्न

अंगणवाडीत येतांना मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारनं पोषण आहार योजना राबवली पण यामुळं महिला बचतगटांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दु:खाची बबाब म्हणजे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच हा प्रकार घडतोय.

Updated: May 18, 2012, 11:52 AM IST

www.24taas.com, सांगली

 

अंगणवाडीत येतांना मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य सरकारनं पोषण आहार योजना राबवली पण यामुळं महिला बचतगटांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दु:खाची बबाब म्हणजे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच हा प्रकार घडतोय.

 

कुपोषणाचं प्रमाण कमी व्हावं यासाठी अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. तर बचत गट सक्षम व्हावे या उद्देशानं पोषण आहाराची कामं सरकारने बचत गटांकडे दिली. पण यामुळं बचत गटांचं नुकसानच जास्त होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या हरीपूरमधल्या बचत गटांना कर्ज काढून आणि उसनवारीवर पोषक आहार बनवावा लागतोय. जवळपास 4 कोटींचं अनुदान रखडल्यामुळं या बचतगटांवर ही वेळ आली आहे. पाच महिन्यांपासून अनुदानाचे पैसे न मिळाल्याने या महिला अडचणीत आल्यात. मुलांना पोषक आहार मिळावा यासाठी काही महिलांनी दागिने गहाण ठेऊन पोषण आहारासाठी रक्कम उभी केली आहे.

 

वेळोवेळी मागणी करुनही जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळत नसल्याचा आरोप बचतगटाच्या महिलांनी केलाय. लवकरात लवकर अनुदान मिळालं नाही तर पोषण आहाराचं काम बंद करण्याच्या विचारात असल्याचं बचतगटांनी सांगितलंय. अधिका-यांनी मात्र लवकरच बचत गटांना हे अनुदान दिलं जाईल असं सांगितलंय. बचतगटांना वेळेत रक्कम न मिळणं, हे नेहमीचच रडगाणं आहे. एकीकडे मुलं कुपोषित होऊ नये, म्हणून वेळप्रसंगी बचतगटाच्या महिला दागिने गहाण ठेऊन पोषक आहार बनवतात. पण, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातच ही वेळ यावी याहून मोठं दु:ख दुसरं कोणतं असणार?