पावणे दोन लाखांचा तांदूळ जप्त

पिंपरी चिंचवड मध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही ताब्यात घेतलाय.

Updated: Jul 22, 2012, 11:49 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पिंपरी चिंचवड मध्ये शालेय पोषण आहारासाठी आलेल्या तांदळाची पोती काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी धाड टाकत दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी तांदळाचा ट्रकही ताब्यात घेतलाय. तब्बल पावणे दोन लाखांचा हा तांदूळ आहे. या प्रकरणी सुरुची केटरर्सच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमधल्या सुरुची केटरर्स कडून पिंपरी चिंचवडमधल्या तब्बल २५० शाळांना शालेय पोषण आहार पुरवला जातो. या योजनेअंतर्गत मिळालेले धान्य पुण्याच्या गोदामातून उचलला जातो. सुरुची केटरर्सचा संचालक विजय कुमार बेदमुथा हा माल त्याच्या गोदामात उतरवत असे आणि त्यानंतर सरकारी पोत्यातून हा माल तो साध्या पोत्यात भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठवत असे. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी सुरुची केटरर्सचे संचालक विजय कुमार बेदमुथा आणि त्याचा साथीदार संजय वाघोलीकर याना अटक केलीय.

काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलिसांनी रेशन दुकानांमध्ये झालेल्या काळ्या बाजाराचा भांडाफोड केला होता. त्यात तब्बल ५ कोटीपर्यंतचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर हा भ्रष्टाचार समोर आलाय. पोलिसांनी छापा टाकत पकडलेला तांदूळ तब्बल पावणे दोन लाखांचा आहे. बेदमुथा याच्याप्रमाणेच आणखी कोणी यात सहभागी आहे का याचा पोलीस आता शोध घेत आहेत. पण शालेय पोषण आहारातल्या घोटाळ्यामुळं एकच खळबळ  उडाली आहे.