www.24taas.com, पुणे
पुण्यात जिल्हा कोर्टाबाहेर कामगार पुतळा परिसरात गोळीबार झाला आहे. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात विजय कारके नावाचा तरुण जखमी झाला आहे. शिवाजी कोर्ट परिसरात ही घटना घडली आहे. मनसेचा भोर तालुक्यातील स्थानिक नेता संदीप बांदल खून प्रकरणातल्या आरोपींनी हा गोळीबार केल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे परिसरातच खळबळ व्यक्त करण्यात आली.
मनसे कार्यकर्ता संदीप बांदल याचा २००८ मध्ये खून झाला होता. या प्रकरणी रोहित चोरगे आणि अन्य १५ जणांना याला अटक करण्यात आली होती. रोहित काही महिन्यांपूर्वी जेलमधून पळाला होता. आज संदीप बांदल खून प्रकरणाची सुनावणी कोर्टात होणार होती.
बांदल हत्या प्रकरणी एक महत्त्वाची साक्ष शिवाजी नगर कोर्टात होणार होती. यावेळी रोहित चोरगे आणि त्याचे साथीदार कोर्ट परिसरात आले होते. ही साक्ष ऐकण्यासाठी विजय कारकेसह बांदल यांचे दहा तेपंधरा समर्थक आले होते. त्यांनीच या प्रकरणातल्या साक्षीदारांवर गोळीबार केल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात साक्षीदारांनी आरोपीविरोधात साक्ष देऊ नये, यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
विजय कारके यांच्यावर सध्या ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरुन तपास सुरू केला आहे.