चला पाठीवरचं ओझं कमी झालं, टॅबगुरू आले...

विद्यार्थी मित्रांसाठी आता आहे एक खूशखबर.. कारण की, आता त्यांना पाठीवर अभ्यासाचं ओझं घेऊन जावं लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थीदेखील नक्कीच खूश होणार आहेत.

Updated: Jul 18, 2012, 10:20 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

विद्यार्थी मित्रांसाठी आता आहे एक खूशखबर.. कारण की, आता त्यांना पाठीवर अभ्यासाचं ओझं घेऊन जावं लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थीदेखील नक्कीच खूश होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी देशातील पहिला शैक्षणिक ‘टॅबगुरू’ दाखल झाला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिकपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा टॅब उपयुक्त ठरणार असून ई-लर्निंगला खर्‍या अर्थाने गती मिळणार आहे.

 

आय.टी.बिझनेस सोल्युशन क्षेत्रात प्रगती करणार्‍या अल्फाबेटिक्स कॉम्प्युटर सोल्युशन सर्व्हिस लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज कुरुलकर यांच्या हस्ते हिंदुस्थानातील पहिल्या एज्युकेशनल ‘टॅबगुरू’चे आज अनावरण झाले. टॅबवर ऑफलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारी अल्फाबेटिक्स कॉम्प्युटर ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

 

या टॅबमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकपर्यंतचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसईचा अभ्यासक्रम हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांत उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यापासून तो देशातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना ऍनिमेशन आणि व्हिडीओ अशा दोन्ही स्वरूपात अभ्यास पाहायला मिळणार आहे.

 

विशेष म्हणजे टॅबमध्ये मनोरंजनासह इंटरनेटची व्यवस्था असली तरी अभ्यासासाठी कोणत्याही नेटवर्किंगची गरज नसल्याचे कुरुलकर यांनी सांगितले. टॅबमध्ये एका शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम प्री-लोडेड केलेला आहे. तर पुढच्या शैक्षणिक वर्षांचा अभ्यासक्रम वितरकांकडून रिलोड करून घेता येतो. पाच ते पंधरा हजार रुपयांत उपलब्ध आहेत.