www.24taas.com, लंडन
आपण नेहमीच आपल्या जुन्या मित्रांना शोधतो. सध्या आपल्या संपर्कात नसलेला शाळेतला - लहानपणीचा आपला एखादा मित्र किंवा मैत्रिण फेसबूकच्या साहय्यानं आपल्याला भेटली तर... या आशेनं आपण तासनतास फेसबूकचे पेजस् चाळतो आणि आपल्याला खरंच अशी एखादी व्यक्ती फेसबूकवर सापडली तर कोण आनंद... यापेक्षा कित्येक पटीनं मोठा आनंद सुसानला झाला कारण तिनं एखाद्या मित्राला नव्हे तर आपल्या परिवारालाच फेसबूकवरून शोधून काढलं होतं.
ब्रिटनमधली ही खरीखुरी घटना आहे. सुसान अरड्रॉन ही ३४ वर्षीय महिला आपल्या परिवारासमवेत दक्षिण आफ्रिकेमध्ये वसलेली होती. १९७८ साली झालेल्या एक गंभीर दुर्घटनेला सुसान बळी पडली. यावेळी तिचा नवराही तिच्यासोबत होता. पण, सुसान आणि तिच्या पतीचे संबंध यावेळी इतके बिघडलेले होते की त्यानं सुसानला घटनास्थळीच सोडलं. जाताना त्यानं सुसानजवळ काही ओळखपत्र राहणार नाही, याचीदेखील काळजी घेतली होती.
यानंतर सुसानचा नवरा आपल्या चार मुलांसमवेत यॉर्कशायरमधील रॉथर्टम या ठिकाणी राहायला गेला. सुसानच्या आई, भाऊ-बहिण आणि मुलांनी तिच्या परण्याची आशा सोडून दिली होती. इतकंच नव्हे तर या दुर्घटनेत ती मृत पावली, यावर त्यांचा विश्वास बसला होता. त्यांनी सुसानला मृत घोषितही केलं. सुसान या दुर्घटनेतून वाचली पण ती ‘एम्नेशिया’ म्हणजे विसरण्याच्या आजाराला बळी पडली.
पण, हळूहळू तिची स्मृती परत येऊ लागली. यानंतर जोहान्सबर्गमध्ये सुसानला या अवस्थेत सांभाळणाऱ्या परिवारानं सुसानच्या परिवाराचा शोध सुरू केला. यासाठी त्यांनी फेसबूकची मदत घेतली आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळालं. फेसबूकवर मिळालेल्या फोटोनंतर सुसानच्या भावाला आपली बहिण जिवंत असल्याची खात्री पटली. आता सध्या सुसानच्या बहिणी ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडे सुसानच्या पासपोर्टची मागणी करत आहेत, ज्यायोगे सुसानला परत आपल्या घरी आणता येईल.
.