www.24taas.com, शशिकांत पाटील, लातूर
लातूरमध्ये जळकोट तालुक्यात भरलेल्या दत्त जयंतीच्या यात्रेत खुलेआमपणे जुगार खेळला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी मुलं शाळा बुडवून जुगार खेळतात. आणि भरयात्रेत भावी पिढी बिघडतेय ती पोलिसांच्या संरक्षणात.
लातूर जिल्ह्याच्या डोंगरी भागातल्या जळकोट तालुक्यात दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरते. इतर लहान मुलांप्रमाणेच इथल्याही मुलांना यात्रेचं आकर्षण आहे, ते शाळा बुडवून यात्रेत जातात. मात्र त्यांना यात्रेतला आकाशपाळणा, विविध प्रकारचे खेळ आणि खाण्याच्या पदार्थांच आकर्षण नाही.. तर जळकोटमधली मुलं शाळा बुडवतायत ती यात्रेत येऊन जुगार खेळण्यासाठी...
तितली नावाचा जुगार ही मुलं खेळतात. दहापट पैशाचं आमिष दाखवून मुलांना चुकीच्या मार्गाला लावण्याचा हा गोरखधंदा इथे खुलेआम सुरु आहे आणि तोही पोलिसांच्या आशिर्वादाने... `झी 24 तास`च्या टीमने जेव्हा अचानक इथे धाड टाकली तेव्हा सर्वत्र एकच धावपळ उडाली. आम्ही जेव्हा या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं. आमच्या प्रश्नांना सराईतपणे खोटी उत्तर देणारी ही मुलं गुटख्याच्याही आहारी गेल्याचं आढळलं.
जळकोटमध्ये चाललेला प्रकार `झी 24 तास`ने पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर झोपेचं सोंग घेतलेल्या पोलिसांनी जाग आल्याचं नाटक केलं आणि नाईलाजास्तव तिघांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. राज्याचे गृहराज्यमंत्री असलेले सतेज पाटील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृहराज्यमंत्र्यांनी पालकत्व घेतलेल्या लातूर जिल्ह्यात पोलिसांच्या आशिर्वादानेच खुलेआम चाललेला हा जुगार म्हणजे गृहखात्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे.